मंडणगड : तालुक्यातील कुंबळे एसटी स्टॉपच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांवर मंडणगड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी दुधेरे येथील दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई २६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. एकाच ठिकाणी अर्ध्या तासाच्या अंतराने या दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल विनय रमेश पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास कुंबळे एसटी स्टॉपच्या पाठीमागे असलेल्या झाडाच्या आडोशाला संशयास्पद हालचाली सुरू होत्या. पोलिसांनी तपासणी केली असता, देवजी विष्णू पवार (वय ४७, रा. दुधेरे) हा दुपारी ४.३५ वाजता तर दिलीप शांताराम पवार (वय ४८, रा. दुधेरे) हा सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहाथ आढळून आले.
हे दोघेही सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचे सेवन करत होते. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात देवजी पवार आणि दिलीप पवार या दोघांवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८ (क) आणि २७ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






