GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : शिक्षण पद्धती आमूलाग्र बदलली पाहिजे – अविनाश धर्माधिकारी

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी: ‘घोका आणि ओका’ ही सध्याची शिक्षण पद्धती बदलणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवाराचे प्रमुख निवृत्त सनदी अधिकारी व ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल आयोजित स्वर्गीय माधवराव परांजपे स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प म्हणून धर्माधिकारी यांचे ‘भारतीय शिक्षण पद्धती- उद्या’ या विषयावर व्याख्यान मंगळवारी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात तुडुंब गर्दीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर भारतीय शिक्षण पद्धती पुन्हा अवलंबणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाची पहिली शाळा ही घर असते. त्यामुळे पालकांची भूमिका शिक्षकांपेक्षाही अधिक महत्त्वाची ठरते. त्यानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि संवेदनशीलता ठेवणे गरजेचे आहे, भारतीय शिक्षण प्रणाली पुन्हा उभी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून, भारतीय शिक्षण पद्धतीवर आधारित जागतिक दर्जाचे विद्यापीठ उभारण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे.

भारतीय शिक्षण प्रणालीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, ब्रिटिशांनी जाती-पातीचे राजकारण करून समाजात फूट पाडली. त्याचे परिणाम आजही जाणवत आहेत. थोर व्यक्तींची जातीनिहाय विभागणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी कुसुमाग्रजांची ‘रात्र झाल्यावर शहरातले पाच पुतळे जमले’ या कवितेचा संदर्भ दिला. ‘ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबत भारतीय समाजात फूट पाडली. आपापसात लढवून, मतभेद निर्माण करून भारतीय अखंडतेचे वस्त्र कसे फाडता येईल, यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक विष पेरले. त्या धोरणाची विषारी फळे आपण आजही भोगत आहोत, असेही ते म्हणाले.

पंचकोषाधारित गुरुकुल पद्धती ही भारतीयांची खरी शिक्षण परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शिक्षण म्हणजे स्वतःची ओळख’ हा विचार मांडताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ दिला. स्वाध्याय, अनुभवातून शिक्षण, सहभागातून शिक्षण आणि ज्ञाननिर्मितीची क्षमता विकसित करणारी शिक्षण पद्धती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोठारी आयोग, राधाकृष्णन आयोग आणि राजीव गांधी यांच्या काळातील नवीन शिक्षण धोरणे चांगली होती, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इंग्रजांनी केवळ कारकून तयार करण्यावर भर दिला आणि तीच पद्धत पुढे सुरू राहिली, अशी टीकाही त्यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार ओक यांनी केले. या वेळी स्व. माधवराव परांजपे यांच्या कार्यावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. कार्यक्रमाला एस. आय. ग्रुप ऑफ इंडियाचे सचिन अणेराव, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, निमंत्रक डॉ. अतीन औताडे, निवृत्त एअरमार्शल हेमंत भागवत, प्रदीप पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.स्वर्गीय माधवराव परांजपे यांच्या स्मरणार्थ रांगोळी साकारणारे संतोष केतकर, तसेच श्रीमती परांजपे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्य अमेय भावे यांनी पद्य सादर केले. सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले. कार्यक्रमाला संस्कार भारतीचे सहकार्य लाभले.

Total Visitor Counter

3295059
Share This Article