GRAMIN SEARCH BANNER

देवरुख येथे ‘चक्रभेदी सोशल फाऊंडेशन’तर्फे अनोखी भाऊबीज साजरी

Gramin Varta
212 Views

देवरुख : सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे आणि हृदयस्पर्शी उदाहरण देत, ‘चक्रभेदी सोशल फाऊंडेशन’ने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साडवली, देवरुख येथील ‘मायेचं हक्काचं घर’ निवारा केंद्रात अनोखी भाऊबीज साजरी केली. निराधार महिलांना एकत्र आणून त्यांना मायेचा आधार देण्याचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला.

यावेळी संस्थेतर्फे निवारा केंद्रातील सर्व महिलांना ओवाळून खास दिवाळीचा फराळ वाटण्यात आला. या फराळात साजूक तुपातील मूग डाळीचे लाडू, रव्याचे लाडू, चिवडा, गोड शन्करपाळ्या, खारी शन्करपाळ्या, चकल्या आणि करंज्या यांचा समावेश होता. उपस्थित महिलांनी देखील एकमेकींना ओवाळून भाऊबीजेचा गोडवा अनुभवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात वैदेही सावंत यांनी दिवाळीपूर्वी आयोजित केलेल्या उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाची आणि फराळ प्रशिक्षणाची माहिती दिली. त्यांनी महिलांना घरकामापलीकडे विचार करून, स्वावलंबनासाठी एकत्र येऊन आपले प्रश्न मांडण्याचे आवाहन केले.

यावेळी रावसाहेब चौगुले यांनी आपल्या मनोगतात ‘मायेचं हक्काचं घर’ हे केवळ निवारास्थान नसून, येथे तुम्ही रोजगार निर्मिती करून स्वावलंबी बनू शकता, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आरती बने यांनी विधवा महिलांचे कुंकू पुसणे आणि बांगड्या फोडणे यासारख्या अनिष्ठ प्रथा तातडीने बंद केल्या पाहिजेत, असे परखड मत मांडले.

संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिपाली जाधव यांना ‘आदर्श स्वयंसेवक’ म्हणून साडी, चोळी आणि नारळ देऊन गौरविण्यात आले. तसेच, पूजा लिंगायत यांचा कष्टाळू आणि प्रामाणिक उद्योजिका म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला तो म्हणजे निवारा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणारे रावसाहेब चौगुले यांना सर्व महिलांनी भाऊ मानून ओवाळले आणि त्यांचे आभार मानले. या मायेच्या बंधाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपंदा राणा, वैदेही किर्वे, गुलणार पकाली, सिमा रेडीज आणि श्रद्धा प्रसादे यांनी विशेष मेहनत घेतली. अशा प्रकारे ‘चक्रभेदी सोशल फाऊंडेशन’ने सामाजिक समतेची आणि माणुसकीची दिवाळी या निराधार महिलांसोबत साजरी केली.

Total Visitor Counter

3379087
Share This Article