रत्नागिरी: शहरानजीकच्या कुवारबाव-पारसनगर येथे माणुसकीला लाजवणारी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या पोटच्या मुलीला जन्मदात्या आईनेच सतत रडण्याच्या रागातून ठार केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पोटची हुरेन आसिफ नाईक (वय ८ महिने) ही सतत रडत असल्यामुळे तिच्या आईने, शाहिन आसिफ नाईक (वय ३६) हिने क्रूरतेची परिसीमा गाठली. रागाच्या भरात शाहिनने निष्पाप हुरेनच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्यानंतर हाताने तिचे नाक दाबून तिचा जीव घेतला. या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ संशयित महिला शाहिन नाईक हिला अटक केली. गुरुवारी (२५ सप्टेंबर) तिला रत्नागिरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शाहिन नाईक ही लग्नानंतर चिपळूण येथील अलोरे येथे राहत होती, मात्र काही दिवसांपूर्वी ती माहेरी रत्नागिरीतील कुवारबाव-पारसनगर येथे आली होती. घटनेच्या दिवशी, बुधवारी तिचे वडील आजारी असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यामुळे शाहिनची धाकटी बहीण त्यांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयात गेली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आणि सतत रडणाऱ्या हुरेनचा राग आल्याने शाहिनने हे भयंकर कृत्य केले.
सायंकाळी उशिरा शाहिनची धाकटी बहीण रुग्णालयातून घरी परतली असता, हुरेनचा आवाज येत नसल्याने तिला संशय आला. तिने बहिण शाहिनकडे विचारणा केली असता, तिने हुरेन झोपल्याचे सांगितले. मात्र, शंका बळावल्याने धाकट्या बहिणीने तत्काळ हुरेनला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती हुरेनला मृत घोषित केले. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित शाहिन नाईकला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.