GRAMIN SEARCH BANNER

समाज कल्याण विभागामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा

गरिबा घरच्या घोंगड्याला शेतकऱ्यांच्या बांधाला राजसिंहासन मानणारे खरे लोकराजे – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी : अवघ्या 28 वर्षाच्या कालखंडात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी विशेषत: समाजातील वंचित, बहिष्कृत वर्गासाठी राजेशाहीत समतेची लोकशाही निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज होते. गरिबांच्या घरी, शेतकऱ्यांच्या बांधावर राजसिंहासन घेऊन जाणारे किंबहुना गरिबाघरच्या घोंगड्याला शेतकऱ्यांच्या बांधाला राजसिंहासन मानणारे छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजे होते, अशा शब्दात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी त्यांना अभिवादन केले.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येथील सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शितल सोनटक्के, महात्मा जोतिबा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल नवरु, पोलीस निरीक्षक पवनकुमार चौधरी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या नांगरासाठी तोफा देणारे राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने महाराजांचे महाराज होते, असे सांगून श्री. सातपुते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन प्रकर्षाने जाणवतो. 1920 च्या माणगाव परिषदेत बहिष्कृतांचे पुढारी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेतृत्त्व त्यांनी पुढे आणले आहे. आंतरजातीय विवाहाचा कायदा करुन त्याची अंमलबजावणी स्वत:पासून करणारे शाहू महाराज यांच्यासारखे दुसरे उदाहरण जगात सापडणार नाही. अशा शाहू महाराजांचा भक्त होण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर चालणारे अनुयायी होण्याची खरी गरज आहे.

सहाय्यक आयुक्त श्री. घाटे यांनी स्वागत प्रस्ताविक करुन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत आशिष कांबळे यांनी केले. आभारप्रदर्शन प्राजक्ता मराठे यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, गृहपाल दिपक जाधव, गृहपाल रविंद्र कुमठेकर, निरीक्षक अमोल पाटील, लिपीक संतोष खेडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2475317
Share This Article