GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरात फुलवली ‘सोनेरी’ शेती! कृषी पदवीधराची झेंडूतून लाखोची झेप!

Gramin Varta
419 Views

सचिन यादव / संगमेश्वर

कोकणातील तरुण नोकरीच्या शोधात मुंबई-पुण्याकडे धाव घेत असताना, संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावच्या एका तरुण कृषी पदवीधराने मात्र आपल्या मातीची सेवा करण्याचा निर्णय घेतला. शुभम दोरकडे या तरुणाने कष्टाच्या जोरावर झेंडू फुलशेतीचा यशस्वी प्रयोग केला असून, त्यातून तो आता लाखोंची कमाई करत आहे.

शुभम दोरकडे यांनी कृषी विषयाचे शिक्षण घेतले आहे. पदवी मिळाल्यावर एखाद्या कंपनीत नोकरी करण्याऐवजी त्यांनी आपल्या मालकीच्या तीन एकर शेतीमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पारंपरिक पिके घेतली, मात्र त्यात अपेक्षित यश किंवा नफा मिळाला नाही. शेवटी अनुभवातून शिकत त्यांनी व्यावसायिक फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
गेल्या तीन वर्षांपासून शुभम झेंडूची लागवड करत आहेत. यावर्षी त्यांनी महामार्गालगत असलेल्या सुमारे एक एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड केली आहे. योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे झेंडूचे पीक जोमाने आले असून, यातून लाखोंची उलाढाल होईल अशी शुभम यांना खात्री आहे. विशेष म्हणजे शुभम यांनी केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर गट शेतीच्या माध्यमातून परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही या प्रवासात सहभागी करून घेतले आहे.

कोकणात सध्या नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राण्यांचा उपद्रव आणि मजुरांची टंचाई यामुळे अनेक जमिनी पडीक आहेत. अशा परिस्थितीत शेतीपासून दूर जात असलेल्या तरुणांसाठी शुभम एक आशेचा किरण ठरत आहेत. कष्टाची तयारी आणि योग्य दिशा असेल, तर शेती हा तोट्याचा नाही तर आर्थिक समृद्धी देणारा व्यवसाय ठरू शकतो, हेच शुभमने सिद्ध केले आहे. त्यांच्या या जिद्दीला आणि मेहनतीला आता संपूर्ण तालुक्यातून सलाम केला जात आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरीचे अनेक पर्याय होते, पण स्वतःच्या जमिनीवर काहीतरी करून दाखवायचे होते, असे शुभम अभिमानाने सांगतात. झेंडू शेतीने त्यांना ओळख आणि आर्थिक स्थैर्य दोन्ही मिळवून दिले आहे.

Total Visitor Counter

3369880
Share This Article