रत्नागिरी : २ हजार रुपये दिले नाही म्हणून मुलाने वडिलांना दुसऱ्या मजल्यावरून ढकलले

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: खर्चासाठी मागितलेले दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांनाच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना कुवारबाव येथे घडली आहे. या भीषण घटनेत वडील गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी संशयित आरोपी पुत्राविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज प्रभाकर सणस (वय ५३, रा. वाई, सातारा, सध्या कुवारबाव) हे कुकिंगचा व्यवसाय करतात. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मनोज सणस आणि त्यांचा मुलगा प्रणय सणस हे संगम हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका पडीक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसले होते. यावेळी प्रणयने वडिलांकडे खर्चासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र, मनोज सणस यांनी आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगत केवळ २०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. याचा प्रचंड राग अनावर झालेल्या प्रणयने वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपी प्रणयने वडिलांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत तोल गेल्याने मनोज सणस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळले.

या अपघातात मनोज सणस यांना गंभीर दुखापत झाली आणि ते रात्रभर त्याच अवस्थेत तिथेच पडून होते. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी त्यांनी कशीबशी आपल्या मित्राशी संपर्क साधला. त्यानंतर मित्र दीपक घाटगे यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा जबाब नोंदवून घेतला. या जबानीवरून पोलिसांनी आरोपी प्रणय मनोज सणस याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२५(अ), ३५२, ३५१(२), १३१ आणि १२५(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्या मुलानेच अशा प्रकारे हिंसक कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *