GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत आंबा व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण; जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची चैन तोडली

Gramin Varta
56 Views

रत्नागिरी: किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका आंबा व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथे घडली आहे. या हल्ल्यात व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून आणि चष्मयाचे नुकसान झाले असून, आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बाबु भोजे (वय ४९, रा. चांदोर) हे आंबा व्यवसायानिमित्त कार्यरत असताना, २५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी प्रतिक खरात (रा. सापुचेतळे, लांजा) याने त्यांना फोन केला. माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला धमकी का दिलीस, अशी विचारणा करत आरोपीने भोजे यांना फोनवर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपण कोणतीही धमकी दिली नसल्याचे स्पष्ट करत, या वादावर पडदा टाकण्यासाठी भोजे हे ओळखीच्या मध्यस्थांना भेटायला आपल्या चारचाकी गाडीने सापुचेतळे येथे गेले.
भोजे यांची गाडी सापुचेतळे येथे पोहोचताच आरोपी प्रतिक खरात याने त्यांची गाडी अडवून काचेवर जोराने हात मारले. भोजे यांनी गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली असता, आरोपीने गाडीचा दरवाजा जोरात उघडून भोजे यांना बाहेर ओढले. त्यानंतर हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर आणि उजव्या हातावर सपासप वार केले. या झटापटीत भोजे यांना रस्त्यावर ढकलून देण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटली आणि डोळ्यांवरील चष्मयाचेही नुकसान झाले. मारहाण केल्यानंतर आरोपीने त्यांना ‘तुला जिवंत मारून टाकीन, कापून टाकीन’ अशी गंभीर धमकी देऊन तिथून पळ काढला.

या घटनेनंतर रमेश भोजे यांनी तातडीने पूर्णगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(३), ३२४(४) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२६ नुसार आरोपी प्रतिक खरात याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3335782
Share This Article