GRAMIN SEARCH BANNER

देवरूख पोलीसांचा थरारक पाठलाग! गुटख्याने भरलेली गाडी हातखंबा येथे पकडली; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघेजण ताब्यात

समीर शिगवण / वांद्री : रात्रीच्या काळोखात गुटखा विक्रीसाठी नेणाऱ्या गुटखा माफियांना पोलीसांनी थरारक पाठलाग करून दणका दिला. देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, हातखंबा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने, तब्बल 8 लाखांचा गुटखा हातखंबा येथे जप्त केला. यामध्ये 3 लाखांचा गुटखा आणि 5 लाखांची गाडी असा एकूण 8 लाखांचा समावेश आहे. देवरूख पोलिसानी चौघांना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास गस्त घालत असताना दाभोळे येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी गाडी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे देवरुख पोलीसांच्या निदर्शनास आले. चौकशीसाठी पोलीस जवळ जाताच चालकाने गाडी वेगात पळवली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग सुरू केला आणि हातखंबा ग्रामीण पोलीसांना याची माहिती दिली. संयुक्त कारवाईत हातखंबा येथे गाडी अडवण्यात आली. झडती दरम्यान विक्रीसाठी बेकायदेशीर गुटखा आढळून आला. गाडीतील चौघांना ताब्यात घेत गाडी व गुटखा असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अंमली पदार्थ व बेकायदेशीर वस्तू विरोधी मोहिमेला गती दिली आहे. या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या यशस्वी धाडसी कारवाईबद्दल देवरूख पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

2474942
Share This Article