रत्नागिरी: गोळप कट्टाच्या जुलै महिन्यातील तिसऱ्या शनिवारी आयोजित ६९ व्या कार्यक्रमात कोळंबे, रत्नागिरी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, कीर्तन अलंकार सौ. सायली मुळ्ये-दामले यांचे मनोगत ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी ही विशेष मुलाखत श्री. अविनाश काळे यांनी घेतली, आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सायलीताईंनी आपल्या यशामागची प्रेरणा आणि प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला.
चिपळूण येथे जन्मलेल्या सायलीताईंचा जीवनप्रवास निवळीहून रत्नागिरीला स्थलांतरित झाल्यावर सुरू झाला. शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आई त्यांना आणि त्यांच्या मोठ्या भावाला घेऊन रत्नागिरीला आल्या. सुरुवातीला परशुरामपंत अभ्यंकर विद्यालय आणि नंतर फाटक हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या आई-वडिलांना संगीताची प्रचंड आवड असल्याने संगीताचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. बालवाडीत असतानाच पेटीची आवड लागली आणि आईने त्यांच्यासाठी घरी पेटी आणली. सुरुवातीला भात्याला हात पोहोचत नसल्याने आई भाता ओढायची आणि त्या सुरांवर स्केच पेनने लिहिलेले पाहून वाजवायच्या.
गायन शिक्षणाविषयी बोलताना त्यांनी आपल्या गुरू संध्या सुर्वे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गुरुकृपाच्या एका कार्यक्रमात संध्याताईंना पाहून त्यांच्याकडे गाणे शिकण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. संध्याताईंना त्या आपली दुसरी आई मानतात, कारण त्यांनी ‘सा’ म्हणण्यापासून आजपर्यंत त्यांना मनापासून आणि तळमळीने शिकवले आहे. संध्याताईंच्या शिस्तीमुळे रियाझ करण्याची आणि अभ्यासात सातत्य ठेवण्याची सवय लागली, ज्यामुळे आज त्या गायन विशारद झाल्या आहेत. लहानपणी त्यांना संस्कृत आणि गीतेचा अभ्यास करण्यासाठी फडकेशास्त्री आणि अभ्यंकर मावशी यांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे त्यांचा पाया अधिक मजबूत झाला. घरात टी.व्ही. नसतानाही, आई-वडिलांमुळे वाचनाची आवड लागली आणि घर पुस्तकांनी भरून गेले.
कीर्तनकार होण्याचा त्यांचा प्रवासही रंजक आहे. सुरुवातीला कीर्तनाची आवड नसतानाही, कै. किरण जोशी सरांसोबत त्या पेटीची साथ करायच्या. याच वेळी ह.भ.प. नंदकुमार कर्वे बुवा यांनी घेतलेल्या कीर्तन प्रशिक्षण शिबिरात त्यांनी प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने त्यांनीच सायलीताईंना कीर्तन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी चिपळूणचे महेश काणे बुवा यांच्याकडून रीतसर कीर्तन प्रशिक्षण घेतले. या प्रवासात कर्वे बुवा, किरण जोशी सर, नाना जोशी, ढोल्ये बुवा, आणि विशाखाताई भिडे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
आजवर त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, हैदराबाद, आणि गोव्यात मिळून ३५० हून अधिक कीर्तने केली आहेत. काळाराम मंदिर नाशिक, समर्थ सदन सातारा यांसारख्या अनेक नामवंत ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पुण्यात त्यांना युवती कीर्तनकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी नुकतीच कीर्तन अलंकार ही पदवी संपादन केली आहे.
केवळ कीर्तनच नव्हे तर ‘मत्स्यगंधा’, ‘एकच प्याला’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या संगीत नाटकातही त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘मत्स्यगंधा’ मधील सत्यवती ही त्यांची आवडती भूमिका आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनातही संगीत आहे. त्यांचे पती श्री. कैलास दामले उत्तम पखवाज वादक आहेत आणि सासरची मंडळीही संगीत आणि भजनाच्या परंपरेचे पाईक आहेत. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच त्यांना कीर्तनसेवा करणे शक्य होत असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
शेवटी, नवोदित कीर्तनकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी भरपूर वाचन आणि गाण्याचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. श्रोत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी लहानपणी गायलेले “दिन गेले भजनाविण सारे” हे गाणे सादर केले. त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जोशीबाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, झाड, आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपात, सौ. सायली मुळ्ये-दामले यांनी अविनाश काळे यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे पुस्तक भेट दिले. पुढील महिन्यात एका वेगळ्या व्यक्तीमत्वाला घेऊन पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.