चिपळूण : सध्याच्या सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती लागवड जवळपास ८० टक्के पूर्णत्वास गेली आहे. तसे पाहिल्यास जून महिन्यातच भातशेती लागवड पूर्णत्वास जाते, मात्र अधून-मधून कोसळणारा पाऊस भातशेती लागवडीसाठी पुरेसा नसल्याने परिणामी भातशेती लागवडीला विलंब झाला. यामुळे जुलै महिना संपत आला तरी काही ठिकाणी शेती लागवडीची कामे सुरुच असून सद्यस्थितीत मुसळधार पावसाचा फायदा घेत शेतीकामे पूर्णत्वास नेण्यावर विशेष भर दिला जात आहे.
कोकणातील भातीशेती हे प्रमुख पिकापैकी एक असून बहुतांशी शेतकरीवर्गाकडून याच पिकांची लागवड केली जाते. यातूनच तालुक्यात जवळपास १० हजार हेक्टर हे भातशेती लागवडीखाली आहे. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळे मान्सूनपूर्वच्या शेती कामाचा चांगलाच खोळंबा झाला. इतकेच नव्हे तर पेरण्यादेखील वेळेत न झाल्याने यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता. शिवाय जून महिन्याच्या प्रांरभी देखील म्हणावा तसा पाऊस न झाल्याने यामुळे शेती कामे लांबणीवर पडली.
अखेर जून महिन्याच्या अखेरीस पाऊसाचे जोरदार आगमन होताच बहुतांशी शेतकऱ्यानी शेती लागवडीच्या कामाला गती आली होती. चिपळूण तालुक्याचा विचार करता भात लागवडीचे एकूण क्षेत्र १० हजार १८ इतके असून त्यापैकी ५१६ हजार ९५६ इतक्या क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड होते. यंदा बहुतांशी शेतकयांनी रत्नागिरी-८ या भात बियांनाला महिन्याच्या प्रारंभी पाऊसाला जोर आल्याने या पार्श्वभूमीवर शेतीकामे पूर्णत्वास नेण्यावर विशेष भर देण्यात आला होता. यातूनच तालुक्यात आतापर्यंत जवळपास ८० टक्के भातशेती लागवड पूर्णत्वास गेली आहे. तर जुलै महिना संपत आला तरी काही ठिकाणी शेती लागवडीची कामे सुरुच असल्याचे चित्र आहे. दरम्यान, भातशेती लागवडीचे प्रशिक्षण कार्यक्रम देखील तालुका कृषी विभागा राबवला असून त्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.