रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सतीश शिवरकर यांची पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती झाली असून, त्यांची रायगड पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून सतीश शिवरकर रत्नागिरी जिल्ह्यात सेवा देत होते. सुरुवातीला त्यांची पालघर येथून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. या काळात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात शांतता राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याचबरोबर, मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या मोहिमेतही त्यांनी चोख बंदोबस्त राखला.
16 जुलै 2025 रोजी त्यांची रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक पदावरून जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली होती. या बदलीला एक महिना पूर्ण होण्याआधीच त्यांची पुन्हा पदोन्नतीसह बदली झाली आहे. या नव्या जबाबदारीनुसार, आता ते रायगड पोलीस मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळतील.