संगमेश्वर: रेल्वे मंत्रालयाने तिकीट काळाबाजार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले असले तरी, खुद्द रेल्वे गाडीतील टीटीईच तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामुळे “कुंपणच शेत खात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी या गंभीर प्रकाराकडे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात एक निवेदनही सादर केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी वेटिंग तिकीट न देता थेट कन्फर्म रिझर्व्हेशन देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा केवळ कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी झालेली नाही, असे दिसून येत आहे. अजूनही प्रवाशांना वेटिंग तिकिटेच मिळत आहेत. विशेष म्हणजे, गाडीत जागा शिल्लक असतानाही वेटिंग तिकिटे कन्फर्म न होता, प्रवाशांना तत्काळ तिकिटे काढण्यास भाग पाडले जात आहे. ही एकप्रकारे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
एखाद्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाले नाही आणि त्याला तातडीने प्रवास करणे आवश्यक असेल, तर त्याने काय करावे, असा सवाल जाकीर शेकासन यांनी उपस्थित केला आहे. असा प्रवासी जेव्हा रेल्वेतून प्रवास करण्यासाठी गाडीत चढतो, तेव्हा त्याला दुप्पट दंडाची भीती दाखवून टीटीई पैसे उकळून बसण्यासाठी जागा देत असल्याचे प्रकार घडत आहेत. जर तिकीट कन्फर्म होत नसेल, तर टीटीईला आसन देण्याचा काही कोटा आहे का, असा संतप्त सवालही प्रवाशांकडून विचारला जात आहे.
एकिकडे रेल्वे प्रशासन तिकीट काळाबाजार थांबवून कारभार पारदर्शी करण्याचा आणि प्रवाशांना सुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करते. मात्र, दुसरीकडे टीटीईकडून रेल्वे प्रवाशांना मदत मिळण्याऐवजी त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. यावर तातडीने आळा घालून प्रवाशांना सुलभ प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी जाकीर शेकासन यांनी केली आहे.