चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी गावातील क्लिनिकल, स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट, पर्सनल ट्रेनर आणि न्युट्रो जेनीमिक्स कौन्सिलर संध्या संतोष दाभोळकर यांनी 42 कि.मी.च्या जगप्रसिद्ध बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतातून फक्त दोन महिला धावपटूंना या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संधी मिळाली होती, त्यात संध्या दाभोळकर यांची निवड ही चिपळूणसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
संध्या दाभोळकर या खेर्डी येथील पहिल्या आणि एकमेव महिला धावपटू ठरल्या आहेत ज्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेतल्या. त्या डॉ. संतोष दाभोळकर यांच्या पत्नी आहेत. गेल्या बाराशीत जास्त वर्षांपासून त्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर धावत आहेत. टाटा अल्ट्रा इंटरनॅशनल, टीसीएस बंगलोर (5 वेळा), एअरटेल दिल्ली रन (3 वेळा), वाशी, ठाणे, सातारा हिल मॅरेथॉन आणि देशभरातील इतर नामवंत शर्यतींमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
त्यांची कारकीर्द अनेक मानाच्या पुरस्कारांनी आणि विजयानं समृद्ध आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर आयडीबीआय मॅरेथॉनमध्ये सलग तीन वर्षे ब्रँड अॅम्बेसिडर राहिल्या, तसेच नायकी ब्रँडसाठीही त्यांनी अॅम्बेसिडर म्हणून काम केले आहे. कोकण बीच मॅरेथॉनमध्ये त्यांनी सलग चारवेळा विजेतेपद मिळवले, कुंडलिका रिव्हर मॅरेथॉनमध्ये दोन वर्षे विजेतेपद पटकावले आणि कृष्णा डायमंड वूमन मॅरेथॉन (मुंबई) मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवला. नेव्ही मॅरेथॉन मुंबईतही त्या सात वर्षे सलग सहभागी राहिल्या.
आजपर्यंत 200 हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विक्रम केलेल्या संध्या दाभोळकर यांची बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉनसाठी निवड अपेक्षितच होती. 21 सप्टेंबर रोजी जर्मनीतील बर्लिन येथे ही स्पर्धा पार पडली. नुकत्याच चिपळूणमध्ये परत आल्यावर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
चिपळूणची संध्या दाभोळकर बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला धावपटू
