तुषार पाचलकर /राजापूर : गणेशोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत स्टेशन परिसर आणि मुख्य रस्त्याची स्वच्छता केली आहे. संघटनेच्या या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विलवडे रेल्वे स्टेशनवर १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, होळी, गणेशोत्सव, दिवाळी आणि सार्वजनिक पूजा यांसारख्या सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीचं नियोजन करणं आणि स्टेशन परिसर स्वच्छ ठेवणं ही जबाबदारी विलवडे रिक्षा संघटना मागील अनेक वर्षांपासून यशस्वीपणे पार पाडत आहे.
यंदाही स्वातंत्र्यदिन आणि गणेशोत्सवापूर्वी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी एकत्र येत श्रमदान केलं. यामध्ये रेल्वे स्टेशन फाटा ते स्टेशनपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील गवत आणि झुडपं काढून परिसर स्वच्छ केला. तसेच, रस्त्याच्या कडेची पट्टी आणि खड्डे भरण्याचं कामही हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षितता वाढणार आहे.
याव्यतिरिक्त, रेल्वे स्टेशनच्या काही बंद असलेल्या पथदिव्यांबाबत रेल्वे प्रशासनाला कळवून ते लवकरच सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी विलवडे रेल्वे स्टेशन ते पाचल रस्त्यावरील वाढलेली झुडपं काढण्याचं नियोजनही संघटनेने केलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी रिक्षा संघटनेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
विलवडे रिक्षा संघटनेचा सामाजिक उपक्रम: प्रवाशांसाठी रस्ते केले चकाचक
