नवी दिल्ली: तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना भारतरत्न देण्यात यावा, यासाठी सर्वपक्षीय खासदार प्रयत्न करत असल्याचे समजते.
माहितीनुसार, खासदारांच्या ऑल पार्टी फोरमने दलाई लामा यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ८० खासदारांनी एका प्रस्तावावर स्वाक्षरीही केली आहे. तो प्रस्ताव लवकरच देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांकडे पाठवला जाण्याची शक्यता आहे.
खा. भर्तृहरी महताब यांच्या नेतृत्वाखालील ऑल पार्टी इंडियन पार्लमेंटरी फोरम ऑन तिबेट या समूहाने अनेक वेळा सेंट्रल तिबेटीयन अॅडमिनिस्ट्रेशनची (सीटीए) भेट घेतली आहे. दरम्यान, राज्यसभा खासदार सुजित कुमार या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुजित कुमार म्हणाले की, दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावावर ८० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इतर २० खासदारांच्या स्वाक्षऱ्या अद्याप मिळालेल्या नाहीत. १०० खासदारांच्या स्वाक्षऱ्यांनंतर हा प्रस्ताव सादर केला जाईल.
दलाई लामा यांचे उत्तराधिकारी या विषयासंदर्भात चीनच्या टिप्पणीला उत्तर देताना सुजित कुमार म्हणाले की, चीनला दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार नाही. फोरमने तिबेटचा मुद्दा वेगवेगळ्या व्यासपीठांवर उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेतही यावर चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.
दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची तयारी! भारतातील ८० खासदारांची प्रस्तावावर स्वाक्षरी
