देवरुख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(एन. एस. एस.) स्थापना दिन आणि ‘एन. एस. एस. स्थापना सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या आठवड्यात शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आणि राष्ट्रसेवा या विषयांवर केंद्रित उपक्रम राबविण्यात आले. सप्ताहाची सुरुवात भारतरत्न डॉ. राधाकृष्णन जयंतीनिमित्त प्रा. मयुरेश राणे यांच्या “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानाने झाली. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रा. धनंजय दळवी यांनी “सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व वर्तमान संदर्भ” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शिवराज कांबळे यांनी “आर्टिकल ३७० आणि ऑपरेशन सिंदूर” याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
राष्ट्रीय सेवा योजना दिवस विशेष प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सदानंद भागवत (अध्यक्ष, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ) यांनी “विकसित भारत @2047 मध्ये युवकांचा सहभाग” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तर पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त डॉ. रणजीत बनसोडे यांनी “हवामान बदल आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम ” या विषयावर सेमिनार घेतला. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या हेतूने उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी “भारतातील गड-किल्ले : आपल्या इतिहासाचा अभिमान” या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले.
शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. सप्ताहाची सांगता जागतिक हृदय दिनानिमित्त डॉ. मयुरेश राणे यांच्या “निरोगी हृदय– निरोगी जीवन” या विषयावरील व्याख्यानाने झाली. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. डॉ. सुनील सोनावणे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे, प्रा. अनिकेत ढावरे आणि प्रा. पिया मोरे यांनी मेहनत घेतली.
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना सप्ताह उत्साहात साजरा
