GRAMIN SEARCH BANNER

स्वरोत्सवात मानस कुमार यांच्या व्हायोलिन वादनाने रसिकांची मने जिंकली

Gramin Varta
56 Views

देवरुख: अभिरुची, देवरुख आयोजित “स्वरोत्सव २०२६” या वार्षिक संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पं. विद्युत मिश्रा यांचे पट्ट शिष्य सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री. मानस कुमार यांच्या व्हायोलिन वादनाने गाजला. या मैफिलीला श्री. तनय रेगे  यांच्या तबला साथीने रंग भरला. श्री. मानस कुमार यांनी सर्वप्रथम राग यमन मधील झपतालात निबद्ध असलेली एक बंदिश सादर केली आणि त्या पाठोपाठ त्रीतालात निबद्ध त्याच रागातील द्रुत लयीतील गत सादर केली. पहिल्या मिनिटापासूनच व्हायोलिनचे सूर आणि रंजक वादन शैलीतील श्री. मानस कुमार यांचे व्हायोलिन वादन यांनी रसिकांची मने भारावून टाकली. त्यानंतर राग झिंझोटी मधील एक बंदिश ऐकताना रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले.

श्री. मानस कुमार यांनी सुप्रसिद्ध असलेल्या आणि रसिक मान्यता मिळालेल्या काही रचना सादर केल्या. त्यामध्ये मिश्र पहाडी रागातील सुप्रसिद्ध साऊंड ऑफ व्हॅली या अल्बम मधील दादरा तालातील धून, अर्धा त्रीतालातील(आद्धा) “या भवनातील गीत पुराणे” हे संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील नाट्यगीत, रूपक तालातील “हे सुरांनो चंद्र ” हे संगीत ययाती आणि देवयांनी या नाटकातील नाट्यगीत; त्रीतालातील  “घेई छंद मकरंद” हे संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील नाट्यगीत,भजनी ठेक्यातील “पायोजी मैने राम रतन धन पायो”, “वैष्णव जन तो तेणे काहीये जे”, “बाजे मुरलिया बाजे” अशा भजनांची गुंफण असलेली मालिका(मेडली) अशा अनेकोत्तम रचना सादर झाल्या आणि रासीकांची दाद मिळवून गेल्या. श्री. मानस कुमार यांचे सुमधुर व्हायोलिन वादन, अचूक स्वर लगाव, आलाप, जोड, झाला या वादन कौशल्यावरची आपली हुकूमत, त्याला श्री. तनय रेगे यांची सशक्त आणि पूरक तबला संगत, रासिकांचा उत्तम प्रतिसाद आणि अभिरुचीचे परिश्रमपूर्वक केलेले उत्कृष्ट नियोजन यामुळे स्वरोत्सव २०२६ ची दुसरी मैफिलही दिमाखात साजरी झाली.

अभिरुची तर्फे सर्वांचे स्वागत आणि कलाकार परिचय श्री. महेश आठल्ये आणि श्री. मंगेश प्रभुदेसाई यांनी केला. देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेटये, देणगीदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ. ऋतुजा खटावकर, सौ. नेहा  मलुष्टे, श्री. शिरीष फाटक, श्री. उदय मूळ्ये आणि श्री. नंदकुमार प्रभुदेसाई यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज पूजन करून आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभिरुची संस्थेचे सदस्य श्री. सदानंद बोंद्रे आणि अॅड. समीर आठल्ये यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे स्वागत पुष्पगुच्छ, अत्तरकुपी  आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. प्रसाद गानू, हेरंभ कुलकर्णी व  सोहम प्रभुदेसाई यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

Total Visitor Counter

3377309
Share This Article