संगमेश्वर : तालुक्यातील कनकाडी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावातील सजग नागरिक आणि युवा कार्यकर्ते विकास बारकू गुरव यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांची माहिती सार्वजनिकरीत्या फलकांवर लावण्याच्या मागणीसाठी आता थेट संगमेश्वर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबतचे रीतसर निवेदन त्यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिले असून, येत्या १४ मे २०२६ रोजी हे आंदोलन छेडले जाणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार कोणत्याही विकासकामाच्या ठिकाणी त्या कामाचा तपशील, खर्च आणि कंत्राटदाराचे नाव असलेला माहिती फलक लावणे बंधनकारक असतानाही, कनकाडी गावात अनेक ठिकाणी अशा फलकांचा अभाव असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वी २४ एप्रिल रोजी ग्रामसेवक आणि ५ मे रोजी पंचायत समिती कार्यालयाला लेखी निवेदन देऊन प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, विकास बारकू गुरव यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये देखील ग्रामपंचायतीकडे सविस्तर माहितीची मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सन २०१८ ते २०२६ या कालावधीत १५ व्या वित्त आयोगातून झालेली विकासकामे आणि केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांच्या खर्चाचा हिशोब मागितला आहे. गोताडवाडी येथे बांधण्यात आलेल्या पाण्याची तळी आणि इतर कामांची मूळ एस्टिमेट्स व बिले उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी अर्जाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी येत असूनही सर्वसामान्य नागरिकांना त्या कामांची तांत्रिक माहिती आणि खर्चाचे तपशील का दिले जात नाहीत, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे उदासीनतेने पाहत असल्याचा आरोप करत, जनतेच्या माहिती अधिकाराचे हे उल्लंघन असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. पंचायत समितीसमोर होणारे हे आंदोलन शांततामय मार्गाने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, या आंदोलनामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि कनकाडी गावातील विकासकामांचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




