अलिबाग : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वाकडे जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. १५ वर्षांपासून या मार्गाचे काम रखडलेले आहे. पूर्ण झालेल्या काही भागांना तडे, भेगा पडू लागल्याने मार्गाच्या दुरुस्तीची वेळ आली आहे.त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोणेरे ते दासगावदरम्यान टोळ गावाजवळील उड्डाणपुलाचे काँक्रीटीकरण खराब झाल्याने संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. सध्या येथे जेसीबीच्या साहाय्याने खराब झालेला काँक्रीटचा थर काढून नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या मार्गाला भेगा आणि तडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या उड्डाणपुलाची ही अवस्था चिंताजनक आहे.
दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे ठप्प…
सुरुवातीपासूनच या प्रकल्पात हलगर्जीपणा झाला असून, निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना वाहतूक कोंडी, वळणावळणाचे मार्ग आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
कोकणवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या महामार्गाच्या कामातील त्रुटी समोर आल्याने संबंधित कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. एकूणच, विकासाचे स्वप्न दाखवणार्या या महामार्गावरच तडे जाऊ लागल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षांना धक्का बसल्याचे चित्र आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पंधरा वर्षे काम रखडलेले
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०११ साली सुरुवात झाली होती. भूसंपादनातील दिरंगाई, भूसंपादन मोबदला देण्यास झालेला उशीर, पर्यावरणविषयक मंजूरी मिळण्यात आलेल्या अडचणी यामुळे काम रखडले.
तसेच ठेकेदारांची अकार्यक्षमता आणि ठेकेदार बदलण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेली न्यायालयीन गुंतागुंत आणि वारंवार नादुरुस्त होत असल्याने डांबरीकरणाऐवजी काँक्रीटीकरण करण्याचा झालेला निर्णय यासारख्या कारणामुळे महामार्गाचे काम रखडत गेले. आजही या मार्गावरील महत्त्वाचे पूल आणि बाह्यवळण मार्गांची कामे अपूर्ण आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाआधीच दुरुस्तीची वेळ!






