GRAMIN SEARCH BANNER

दापोली : महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन; शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची कारवाई

Gramin Varta
27 Views

दापोली : महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या एस.टी.च्या वाहक-कम-चालक कर्मचाऱ्याविरोधात अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर एस.टी. प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे लेखी आदेश जारी केले.

या प्रकरणी दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी शुक्रवारी दुपारी दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांची भेट घेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत प्रशासनाला जाब विचारला. “आमच्या आया-बहिणींची अब्रू इतकी स्वस्त नाही. संबंधित विकृत मनोवृत्तीच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला.

यानंतर गुजर यांनी रत्नागिरी विभाग नियंत्रक जानकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्याविरोधातील तक्रारींची माहिती दिली व तातडीने कारवाईची मागणी केली. महिला प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या अनेक तक्रारी असूनही यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. मात्र शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार कार्यालयात धडक देत प्रशासनावर दबाव आणला होता. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, महिला आघाडीच्या पदाधिकारी मानसी विचारे, सिंधू भाटकर, ममता मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर घेतलेल्या या भूमिकेमुळे दापोली तालुक्यात शिवसेनेच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असून, संबंधित कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Total Visitor Counter

3371098
Share This Article