रत्नागिरी : जिल्हा आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची टंचाई ही नेहमीचीच बाब असल्याने सरकारी रुग्णालयात डॉक्टर नसणे आता कोणालाही आश्चर्यकारक वाटत नाही. मात्र, या सर्वसाधारण समजाला छेद देत रत्नागिरी जिल्ह्याने आरोग्य क्षेत्रात अलिकडच्या काळात प्रथमच मोठे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधील एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४३ जागा पूर्णपणे भरण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सेवा देण्यासाठी आणखी ६० डॉक्टरांची प्रतीक्षा यादी जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी या महत्त्वपूर्ण घडामोळीची माहिती दिली. दापोली, कळंबणी, कामथे, राजापूर येथील उपजिल्हा रुग्णालये तसेच पाली, लांजा, देवरुख, गुहागर, मंडणगड, संगमेश्वर, रायपाटण अशा महत्त्वाच्या ग्रामीण रुग्णालयांत मिळून एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी ४३ पदे मंजूर आहेत, ती सध्या कार्यरत डॉक्टरांनी भरली आहेत. शासकीय सेवेत काही काळ काम करण्याची अट पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी आवश्यक असल्याने सध्या आरोग्य विभागाला हे डॉक्टर मोठ्या संख्येने उपलब्ध झाले आहेत, असे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.
६० डॉक्टरांची प्रतीक्षा यादी; टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न
डॉ. जगताप यांनी पुढे सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय सेवेची संधी मिळावी म्हणून आणखी ६० जणांनी अर्ज दाखल केले असून ते सध्या प्रतीक्षा यादीवर आहेत. जिल्ह्यात हजर झालेले हे सर्व डॉक्टर त्यांच्या कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ टिकून राहावेत, यासाठी प्रशासन पातळीवर त्यांना योग्य ती मदत आणि आधार दिला जात आहे. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा अडचण आल्यास वरिष्ठ अधिकारी म्हणून आपण स्वतः जातीने लक्ष घालून ती सोडवणार, असा विश्वास या डॉक्टरांना देण्यात आला आहे.
डॉक्टरांना नियुक्तीचे आदेश देण्यापूर्वी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाचे भौगोलिक स्थान, महत्त्व आणि वैशिष्ट्ये याची संपूर्ण माहिती दिली जाते. ही माहिती डॉक्टरांनी स्वीकारल्यानंतरच त्यांची नियुक्ती केली जात असल्याने, नियुक्त ठिकाणाहून माघारी येण्याची कारणे फारशी शिल्लक राहत नाहीत, अशी माहिती डॉ. जगताप यांनी दिली.
विशेषज्ञ डॉक्टरांची १३ पदे अजूनही रिक्त
उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये मिळून जिल्ह्यात शल्य विशारद (एम.एस.) शिक्षण झालेले तज्ज्ञ डॉक्टरांची १३ पदे मंजूर आहेत. ही सर्वच्या सर्व पदे सध्या रिक्त आहेत. ही विशेषज्ञ पदे भरण्यासाठी शासकीय पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत पदवी प्राप्त (एमबीबीएस) वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या किमान गरजा निश्चितपणे भागवल्या जात आहेत, असे समाधान डॉ. जगताप यांनी व्यक्त केले.