GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जे. के. फाईल्स येथे जागेच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघेजण ताब्यात

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी : शहरातील  जे. के. फाईल्स परिसरात जागेच्या वादातून एका तरुणवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. कय्युम मुबारक खान (वय २६) आणि मारुफ फारुख खान (वय २५, दोघेही रा. कोकणनगर, मराठी शाळेजवळ, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चालकावर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फिर्यादी सिद्धेश रमेश यादव (वय २३, व्यवसाय – चालक, रा. माऊली बंगला, शांतीनगर, रसाळवाडी, रत्नागिरी) हे आपल्या मित्र इम्रान कासिम सय्यद आणि राज घोरपडे यांच्यासह जे.के. फाईल्स कंपनीसमोरील श्री. रमाकांत रामजीलाल शर्मा यांच्या बांधकाम साईटवर लादी बसविण्यासाठी मजूर आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी कय्युम मुबारक खान (वय २६) आणि मारुफ फारुख खान (वय २५, दोघेही रा. कोकणनगर, मराठी शाळेजवळ, रत्नागिरी) यांनी त्यांना रोखत विचारणा केली – “तुमचे येथे काय काम आहे?”

यावेळी किरकोळ वाद सुरू झाला आणि आरोपी मारुफ याने संतापून फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे रागाने पाहू लागला. त्यावर फिर्यादी यादव यांनी “काय बघतोस?” असे विचारताच, आरोपीने शिवीगाळ केली. काही वेळाने सर्वजण साईटच्या पहिल्या मजल्यावरून खाली येऊन मोटरसायकलजवळ थांबले असता, आरोपी मारुफने कय्युमला फोन करून बोलावले.

काही क्षणातच कय्युम खान मोटरसायकलवरून घटनास्थळी पोहोचला आणि त्याच्यासोबत आणलेल्या लोखंडी रॉडने सिद्धेश यादव यांच्या डोक्यात सलग तीन वेळा मारहाण केली. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले. आरोपी पुन्हा वार करण्याच्या प्रयत्नात असतानाच फिर्यादीचे मित्र इम्रान सय्यद आणि राज घोरपडे यांनी प्रसंगावधान राखत रॉड त्याच्या हातातून हिसकावून घेतला.

घटनेनंतर साईटवरील कंत्राटदार आदिनाथ संदीप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन करत पोलिसांना माहिती दिली. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल चौकीतील पोलीस अंमलदार झोरे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या फिर्यादीचा जबाब नोंदवून त्यांना शहर पोलीस ठाण्यात हजर केले.

या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

2650955
Share This Article