GRAMIN SEARCH BANNER

सवतसडा धबधब्यावर तरुण बुडाल्याची अफवा; तरुण सुखरूप, प्रशासनाची धावपळ वाया

Gramin Varta
4 Views

चिपळूण:सवतसडा धबधब्यावर एक तरुण वाहून गेल्याची बातमी शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि शहरात खळबळ उडाली. ही माहिती समजताच प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी धावून गेले. मात्र प्रत्यक्षात काहीही दुर्घटना न घडता संबंधित तरुण सुखरूप सापडला.

खात्रीशीर माहितीनुसार, सदर तरुण आपल्या मित्रासोबत धबधबा पाहण्यासाठी गेला होता. काही वेळ तो नजरेआड झाल्याने मित्राने अघटित घडल्याचा गैरसमज करून चिपळूणमधील ओळखीच्या व्यक्तीस “माझा मित्र पाण्यात वाहून गेला” अशी माहिती दिली. ही चुकीची माहिती क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि “सवतसड्यावर पर्यटक वाहून गेला” अशी चर्चा जोर धरू लागली.

दरम्यान, हरवलेला समजला गेलेला तरुण प्रत्यक्षात डोंगर चढून वर गेला होता. परतीची वाट न सापडल्याने तो काही काळ दिसून आला नाही. शिवाय पावसामुळे मोबाईल खिशातून न काढल्याने संपर्कही झाला नाही. शेवटी तो सुखरूप आढळून आला आणि अनावश्यक धावपळीला पूर्णविराम मिळाला.

या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, कोणतीही माहिती सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करून घ्यावी. अन्यथा अशा अफवा भीती आणि गोंधळ निर्माण करतात.

Total Visitor Counter

2649112
Share This Article