संगमेश्वर तूरळ येथील महावितरण कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक
संगमेश्वर : मुसळधार पावसामुळे तूरळ-कडवई परिसरात 11KV वीजवाहिनीवर भलेमोठे झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आधीच बिघाडामुळे वारंवार ‘ट्रिप’ होणाऱ्या या वाहिनीवर मध्यरात्रीच्या सुमारास झाड पडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती. भयाण जंगलाने वेढलेला परिसर, सर्वत्र काळोखाचे साम्राज्य आणि धोक्याची शक्यता असतानाही, महावितरणच्या तूरळ शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवत रात्रभर काम करत वीजपुरवठा पूर्ववत केला.
दिवसभर सातत्याने ‘ट्रिप’ होणाऱ्या लाईनचा शोध घेण्याचे काम कर्मचारी रात्री ११ वाजेपर्यंत करत होते. कडवई बौद्धवाडीच्या पुढील भागात बिघाड सापडण्याची शक्यता असतानाच, खिंडीत एक मोठे झाड 11KV लाईनवर कोसळले. यामुळे संपूर्ण फिडरसह ट्रान्सफॉर्मर देखील ‘ट्रिप’ झाला आणि ३२७५ वीजग्राहक अंधारात होते. “रात्र झाली आहे, आता सकाळी पाहू” असे म्हणण्याऐवजी, तूरळ शाखेच्या टीमने मात्र ग्राहकांना प्रकाशात आणण्याचा निश्चय केला. रात्री ११ वाजता काम थांबवण्याचा पर्याय असतानाही, त्यांनी थांबणे नाकारले. पहाटे ०४:०० वाजेपर्यंत त्यांचे काम अखंडपणे सुरू होते. 11KV लाईनवर पडलेले हे भलेमोठे झाड हटवणे हे केवळ तांत्रिक आव्हान नव्हते, तर जीवाशी खेळण्यासारखे होते. पावसाने भिजलेली जमीन, घसरड्या वाटा, वन्यजीव आणि सर्पांचा धोका अशा परिस्थितीतही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. रात्रीच्या अंधारात जवळून जाणाऱ्या 33KV वाहिनीवर ‘परमिट’ घेण्यात आले आणि कडवई फिडरवरही ‘परमिट’ घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू झाले.
महावितरणच्या या कर्मचाऱ्यांनी केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर मानसिक बळ, शारीरिक तयारी आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तुंग उदाहरण घालून दिले आहे. धोकादायक परिस्थितीतही ग्राहकांना तातडीने वीज मिळावी, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी हे धाडसी कार्य केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अखेर २५७७ वीजग्राहकांच्या घरांमध्ये पुन्हा प्रकाशझोत पसरला. ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा प्रकाश हाच त्यांचा खरा मोबदला असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले आहे. त्यांचे हे धाडस, चिकाटी आणि टीमवर्क खरोखरच कौतुकास्पद आहे.
भयाण जंगलात रात्रीच्या काळोखात वीज वाहिनीवर पडलेले झाड हटविले, 2577 घरांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत!

Leave a Comment