पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मोहरम ताजीयाला खांदा दिला; एकादशीची पालखी आपल्या खांद्यावर उचलली
राजापूर : राजापूर तालुक्याने यंदाच्या आषाढी एकादशी आणि मोहरम सणांच्या निमित्ताने धार्मिक सलोख्याचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. हे दोन्ही महत्त्वपूर्ण सण येथे अभूतपूर्व शांतता आणि एकोपाच्या वातावरणात साजरे झाले, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी संदेश यातून देण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि पवित्र भावनेने हे सोहळे साजरे केले, जे सामाजिक सलोख्याचे प्रतीक बनले आहे. यामुळे दोन्ही समाजात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या वर्षीच्या सणांनी अनेक लक्षवेधी क्षण अनुभवले. राजापूरच्या इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीची पालखी पोलिसांनी उचलून दिंडीचा शुभारंभ केला. हा क्षण केवळ धार्मिक विधीचा भाग नव्हता, तर तो धार्मिक ऐक्याचा एक अनोखा संदेश देऊन गेला. या घटनेने समाजात परस्पर आदर आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली.
याच राजापुरातून निघणाऱ्या मोहरमच्या मिरवणुकीत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सहभाग घेतला. त्यांनी पवित्र ताझियाला खांदा देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रत्यक्ष संदेश दिला. पोलीस अधीक्षकांच्या या कृतीने धार्मिक सलोखा जपण्याचे आणि एकमेकांच्या सणांचा व परंपरांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
पांडुरंगाच्या मंदिरात नदीतील गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांना राजापूरच्या जनतेने आज प्रथमच पाहिले. त्यांच्या या कृतीने जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही धर्मीयांच्या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहावे आणि येणारे सर्व सण खेळीमेळीच्या वातावरणात साजरे व्हावेत, हाच संदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः जातीनिशी राजापुरात उपस्थित होते. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे राजापूरमध्ये धार्मिक सलोख्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे, जो भविष्यातही कायम राहील अशी अपेक्षा आहे.