रायगड : राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेल(जि. रायगड) ग्रामीणने सापळा लावून एका चार चाकी वाहनामधून व एका खोलीमधून असा मिळून ११ लाख ८५ हजार ५९५ रुपयाचा मद्यसाठा हस्तगत केला असून या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.
विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे, प्रदीप पवार, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग रविकिरण कोले, व उप-अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड- अलिबाग बाबासाहेब भूतकर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग जि. रायगड यांनी तळोजा पोलिस स्टेशन हद्दीत योगेश वजन काट्यासमोर तळोजा एमआयडीसी ता. पनवेल येथे सापळा रचुन एका चारचाकी वाहनामध्ये उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या १७ बाटल्या व ०२ मोबाईल असा एकूण५,४४,३३० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. नंतर योगेश वजन काटे च्या जवळ असलेल्या एका पत्र्याच्या खोलीमध्ये उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या ५४ बाटल्या, विदेशी मद्याच्या ४२ बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, बनावट कागदी लेबले व इतर साहित्य असा एकुण रू. ६,४१,२९५ /- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ११,८५,५९५/-इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे 1) संतोष उरथ 2) बिजु उरथ 3) बिनु कल्लूर या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
सदर कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल ग्रामीण विभाग अनिल जी. बिराजदार, दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1- अजित बडदे, दुय्यम निरीक्षक बीट क्र.3 योगेंद्र लोळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गैनिनाथ पालवे, जवान निखील पाटील, जवान वाहनचालक सचिन कदम यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास रविकिरण कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली अजित बडदे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग क्र.1 जि. रायगड हे करीत आहेत.