नगर परिषदेच्या कारभाराने नागरिक त्रस्त, 8 दिवस लोटले तरी दुरुस्ती नाही
राजापूर : राजापूर शहरातील जवाहर चौक ते जकातनाका हा मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरून गेला आहे. हे कमी की काय राजापूर नगरपरिषदेने कुशे मेडिकल समोरील रस्ता जेसीबीने दुरुस्तीच्या नावाखाली खोदुन ठेवला. 8 दिवस झाले तरी अजून कामाला सुरुवात न केल्याने नागरिकांची चिखलाने अंघोळ होत आहे. नगर परिषदेने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहण्यास सुरुवात केली आहे. आधीच खड्ड्यांनी हैराण झालेले वाहनचालक, पादचारी व दुकानदार आता रस्त्यावर खोदलेल्या चिखलाने पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. पूर्वीचा रस्ता बरा होता अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आता खोदलेल्या रस्त्याच्या चिखलातून मार्ग काढायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ‘दुरुस्तीच्या नावाखाली नुसताच डंका ; खड्ड्यात रस्ते, चिखलात जनता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेला हा रस्ता आज उद्ध्वस्त होत आहे. पावसामुळे वाहणारे पाणी व गटार नसल्याने रस्त्याने वहाळने स्वरूप घेतले आहे. विशेषतः जवाहर चौक ते सुपर बाजार दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.
नागरिकांच्या संतप्त तक्रारीनंतर नगरपरिषद जागी झाली, पण केवळ ‘खोदकाम’ करण्यापुरतीच. कुशे मेडिकल ते सुपर बझार पर्यंतचा रस्ता जेसीबीने उखडून आठ दिवस उलटले तरी आजतागायत कोणतेही दुरुस्तीचे काम सुरु झालेले नाही. परिणामी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे खोदलेल्या रस्त्यावर साचलेले चिखलाचे पाणी रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर उडत आहे, दुकानांत घुसत आहे – आणि प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे.
शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना या मार्गाने चालणे दुरापास्त झाले आहे. खड्ड्यांमुळे केव्हा अपघात होईल याचा नेम नाही, पण नगरपरिषदेची झोप अजूनही पूर्ण झालेली दिसत नाही.
दरम्यान, आमदार किरण सामंत यांनी मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र त्यालाही आता महिना उलटून गेला तरी प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. त्यामुळे “आमदारांचे आदेशही नगरपरिषद दरवाजाबाहेर फेकते का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नगरपरिषद ‘दुरुस्ती’च्या नावाखाली केवळ खोदकाम करत आहे, पण खड्डे भरत नाही – ही नुसती हलगर्जी नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ आहे. यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर रस्त्यावरच आंदोलन करावे लागेल, असे इशारे आता नागरिक देऊ लागले आहेत.
दुरुस्तीच्या नावाखाली नुसताच डंका ; रस्त्यात खड्डे, चिखलात जनता, राजापूरकरांसाठी धोक्याची घंटा

Leave a Comment