बंदी असतानाही पानवल धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी

Gramin Varta
46 Views

प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात स्थानिकांमधून तीव्र संताप

रत्नागिरी: सुरक्षेची गंभीर कारणे आणि वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे आणि पानवल ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध ‘पानवल धबधबा’ पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाचे स्पष्ट आदेश आणि प्रवेशद्वारावर लावलेले इशाऱ्यांचे फलक पूर्णपणे धाब्यावर बसवून पर्यटकांची या धोकादायक ठिकाणी तुफान गर्दी होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

धबधब्याच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच थेट गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलीस व स्थानिक प्रशासनाने लावलेल्या बॅनरवर दिसत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र या बंदी आदेशाची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासकीय आदेश केवळ कागदावर आणि बॅनरपुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र सध्या पानवल धबधबा परिसरात पाहायला मिळत आहे.

ना पोलीस सुरक्षा, ना ग्रामपंचायतीची पाळत
धबधबा परिसरात पर्यटकांना रोखण्यासाठी ना कोणती पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, ना ग्रामपंचायतीचे कर्मचारी पर्यटकांना अडवताना दिसत आहेत. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना शेकडो पर्यटक या धोकादायक क्षेत्रात बिनदिक्कत प्रवेश करत आहेत.
पर्यटकांकडून सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवून धबधब्याच्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात उतरून अत्यंत धोकादायक स्टंट केले जात आहेत. जीवघेण्या जागांवर उभे राहून फोटो आणि रील काढण्याच्या नादात पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.

- Advertisement -

नियम पायदळी तुडवून सुरक्षेचा फज्जा उडवला जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. “प्रशासन पुन्हा एखाद्या मोठ्या अपघाताची किंवा दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ फलक लावून आपली जबाबदारी न झटकता प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
केवळ बॅनर लावून हात वर न करता प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ कडक पोलीस बंदोबस्त तैनात करावा, प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी नाकाबंदी करावी आणि बंदी आदेशाचे उल्लंघन करून सुरक्षेशी खेळणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर जागेवरच दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे. वेळीच पोलीस प्रशासनाने पावले उचलली नाहीत, तर येथे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4672179
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *