GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: स्मार्टवीज मीटर प्रकरणी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक

चिपळूण:  स्मार्टवीज मिटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिल येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय ग्राहकांची संमत्ती नसतानाही जबदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीज मिटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी चिपळूण तालुका काँग्रेसने महावितरणवर धडक देत जाब विचारला. लोकांच्या विरोधामुळे स्मार्ट वीज मिटर बसयू नयेत, त्यास आमचा विरोध आहे. सरकारला स्मार्ट वीज मिटरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असा इशारा, तालुका कॉंग्रेसच्या तीने तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी महाविरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करताना तालुकाध्यक्ष शाह व पदाधिकारी म्हणाले, कोकणात वीज चोरी व थकबाकी प्रमाण फार कमी आहे. शहरात अंडरग्राऊंड विद्युत वाहिन्या करण्याची आवश्यकता आहे. दिवसातून वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाराऱ्यांवर मोठा परीणाम होत आहे. विद्युत महामंडळाने जनतेला चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे. तरीही नागरिकांच्या संमत्तीशिवाय स्मार्ट मीटर लादण्याचा प्रकार सुरू आहे. पूर्वी सर्वसामान्य जनतेकडून मीटर बसविण्यासाठी हजारो रुपयांच्या स्वरुपात अनामत रक्कम जमा करून घेतल्या आहेत. वाढीव बिलामुळे महागाईने ग्रस्त झालेल्या जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. जे मीटर बसविण्यात आले आहेत. त्याचे वीजबील अमाप स्वरुपात येत आहे. शासनाचे इतर कर व युनिट दर भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्य जनतेला लाईट बील भरताना नाकेनऊ येते. याविषयी अनेक तक्रारी जनतेकडून येत आहेत. राज्यातील अनेक विभागात स्मार्ट मीटरला विरोध होत असल्याने त्या-त्या ठिकाणी ही योजना स्थगित करावी लागली आहे. तरीही चिपळूण तालुक्यात महावितरण कडून कोणतीही पूर्वकल्पना न देता व पारदर्शक माहिती न देता नागरीकांवर हे स्मार्ट मीटर लादले जात असून ते खेदजनक आहे. स्मार्ट वीज मिटर बसवल्यानंतर जादा वीज बिल आलेल्या ग्राहकांची बिलेच अधिकाऱ्यांना  दाखवण्यात आली.

यावर कार्यकारी अभियंता धनंजय भामरे म्हणाले, स्मार्ट वीज मिटर बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. लोकांच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवल्या जातील. नविन मीटर बसवल्यानंतर जिथे नागरिकांच्या शंका आहेत, तेथे त्वरित दोन्ही मीटर बसवून शकांचे निरसन करीत आहोत. अनियमीत वीजपुरवठ्या शोध घेतला जाईल. यात कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव,  माजी नगरसेवक कबीर काद्री, रफिक मोडक, इम्तियाज कडु, संजय जाधव, संतोष  सावंत- देसाई, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, शहराध्यक्षा लिना जावकर, सफा गोठे, अनिल रेपाळ, नंदू कामत, यशवंत फके, दादा आखाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455606
Share This Article