लांजा : नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका ४२ वर्षीय व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील कोलधे कुंभारगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील कोलधे कुंभारगाव येथील फिर्यादी ३९ वर्षीय महिला तिच्या घरात एकटीच असताना शेजारी राहणारा विलास गणपत कुंभार याने सन २०१९ मध्ये तिच्या घरात येवून विनयभंग केला होता. त्यामुळे तिने केलेल्या तक्रारीनुसार लांजा कोर्टात या प्रकरणी केस चालू आहे. या केसची २२ ऑगस्ट २०२५ रोजी तारीख असल्याने विलास कुंभार याने गुरुवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सदर फिर्यादी महिला ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता विलास कुंभार याने तिचा हात धरून उद्या कोर्टात तारखेला जाशील तेव्हा केस मागे घे असे बोलून तिचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी पीडित महिलेने लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विलास गणपत कुंभार (वय ४२, रा.कोलधे कुंभारगाव, ता.लांजा ) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रेहाना नावळेकर या करत आहेत.
लांजा : नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा
