झाडावरच अडकल्याने ‘आदर्श विद्यामंदिरा’तील शेकडो विद्यार्थ्यांचे प्राण वाचले!
राजापूर : वाटूळ येथील कापीचा मोडा परिसरातील अवघड वळणावर आज दुपारी 12.30 च्या सुमारास कंटेनरचा भीषण अपघात झाला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला घसरला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून क्लिनरला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळाजवळच वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ही इमारत आहे. जर कंटेनर पलटी मारून खाली गेला असता, तर तो थेट शाळेच्या इमारतीवर जाऊन आदळला असता. त्यावेळी विद्यार्थी वर्गात उपस्थित असल्याने मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
कंटेनर झाडावर आदळून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या कार्यात संतोष बंधू चव्हाण, मानस चव्हाण, नयन चव्हाण तसेच इतर रिक्षाचालक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. त्यांनी जखमी क्लिनरला बाहेर काढून अजय वळंजू यांच्या रिक्षातून ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.