दापोली: दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील लोहारवाडी परिसरात भरदिवसा घरफोडीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहारवाडी येथे राहणाऱ्या अरुणा काताळकर यांच्या बंद घराच्या दरवाजावर अडकवलेली कुलुपाची चावी घेऊन चोरट्यांनी घर उघडून कपाटातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा काताळकर नेहमीप्रमाणे सकाळी शेतावर कामासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद दरवाजावर असलेली कुलुपाची चावी घेऊन घर उघडले. घरात प्रवेश करून त्यांनी कपाटाचे दार उघडले आणि त्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील ‘टॉप’ आणि १ लाख रुपये किंमतीचे काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला.
दुपारी अरुणा काताळकर घरी परतल्यानंतर कॉटवर कपाटातील काही कपडे काढून ठेवलेले त्यांना दिसले. मात्र, नवऱ्यानेच काही कागदपत्र शोधण्यासाठी कपाट उघडले असेल, असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली नाही. पती घरी आल्यावर त्यांनी याबद्दल चर्चा केली असता, पतीने आपण कपाटातील काहीही काढले नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे त्वरित कपाटातील दागिने तपासले असता, ते गायब झाल्याचे आढळले. विशेष म्हणजे, त्याच कपाटात असणारी रोख रक्कम मात्र चोरट्यांच्या निदर्शनास न आल्याने ती तिथेच सुरक्षित आढळली.
या घटनेची लेखी तक्रार तातडीने दापोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. दापोली पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परता दाखवत, चोरीचा तपास करण्यासाठी श्वानपथक, तसेच ठसेतज्ज्ञ आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी बोलावून घेतले आहे. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निर्मळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे लोहारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.