GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पाचलमध्ये भीती; वनविभागाने ग्रामस्थांसाठी जारी केली खबरदारी सूचना

Gramin Varta
461 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील मौजे पाचल आणि गावठाण परिसरात बिबट्याचा वाढता वावर  आणि त्याचे पाळीव प्राण्यांना भक्ष्य बनवण्याचे वाढते प्रकार यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. बिबट्या वारंवार वस्तीजवळ येऊन पाळीव कुत्री, मांजर यांसारख्या प्राण्यांना लक्ष्य करत असल्याच्या अनेक घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत परिमंडळ वन अधिकारी, राजापूर यांनी तातडीने ग्रामपंचायत पाचलच्या सरपंचांना पत्र लिहून ग्रामस्थांनी कोणती खबरदारी घ्यावी, यासंबंधीच्या दहा महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

वन विभागाच्या पत्रातून स्पष्ट होते की, पाचलमधील बाजारवाडी येथे कै. शेठ माबल यांच्या परसबागेत रात्री १ वाजून १५ मिनिटांनी बिबट्या दिसल्याची नोंद झाली आहे, तसेच श्री. तुषार पाचलकर यांनी देखील बिबट्याच्या वावराबद्दल वन विभागाला कळवले आहे. हा बिबट्या आसपासच्या वस्तीतील पाळीव प्राण्यांच्या शोधात येत असावा, असा वन विभागाचा अंदाज आहे.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आणि बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने ग्रामस्थांनी रात्री १०.०० वाजेनंतर ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत, म्हणजेच बिबट्याचा वावर अधिक असतो त्या वेळेत, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच, रात्री-अपरात्री बाहेर पडण्याचा प्रसंग उद्भवल्यास एकट्याने न जाता सोबत कोणाला तरी घेऊन जावे आणि शक्य असल्यास वाहनाचा उपयोग करावा. खबरदारी म्हणून हातात काठी किंवा बॅटरी सोबत असावी आणि रस्त्यावरून चालताना मोठ्याने बोलत जावे, जेणेकरून बिबट्याला मानवी उपस्थितीची जाणीव होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लहान मुलांना सांभाळण्याबद्दल विशेष सूचना देण्यात आली आहे. संध्याकाळच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर सोडणे पूर्णपणे टाळावे. ग्रामस्थांना बिबट्याचा संशयित वावर दिसल्यास किंवा त्याने पाळीव प्राण्याला मारल्यास किंवा जखमी केल्यास, त्वरित कोणतीही हयगय न करता वनविभागास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ग्रामस्थांनी त्यांच्या घराच्या सभोवतालचा २० ते ३० चौ. मीटरचा परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच गावामधून जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असलेले दिवे व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करावी. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अनावश्यक झुडपे साफ करून घेणे आवश्यक आहे.

वन विभागाने जारी केलेल्या या सर्व सूचनांचे ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, सरपंच, ग्रामपंचायत पाचल यांच्यामार्फत या सूचना गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून बिबट्याच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन परिमंडळ वन अधिकारी, राजापूर यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3210466
Share This Article