GRAMIN SEARCH BANNER

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये अभिषेक देवकातेचा नवा विक्रम; मराठी भाषेसाठी हजारो पावले

Gramin Varta
199 Views

रत्नागिरी : येथे आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात अभिषेक देवकाते याने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्याने 21 किलोमीटरचे चढ-उतार व वळणांचे आव्हानात्मक अंतर अवघ्या 1 तास 10 मिनिटे 7 सेकंदांत पूर्ण करत स्वतःचाच मागील विक्रम मोडला. अमोल आमूने याने द्वितीय, तर गौरव काकडे याने तृतीय क्रमांक मिळवला.
महिलांच्या गटात साक्षी जड्याळ हिने 1 तास 23 मिनिटे 22 सेकंदांत अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. श्रेया पाटील व ऐश्वर्या लोंढे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजित या स्पर्धेत देशातील 13 राज्यांतील 300 शहरांतून 2,200 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 21 व 10 किलोमीटर स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली, तर नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते 5 किलोमीटर स्पर्धेला प्रारंभ झाला.
यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी उपस्थित होते. मंत्री सामंत व मान्यवरांचे स्वागत सचिन नाचणकर यांनी सन्मानचिन्ह देऊन केले. एमआयडीसी, राज्य मराठी संस्था व उदय सामंत फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे देवस्थळी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम, दानशूर भक्तीभूषण भागोजीशेठ कीर यांच्या वेशभूषेत काही धावपटूंनी स्पर्धा पूर्ण करत उपस्थितांना प्रेरणा दिली. ठाण्याचे विठ्ठल कांबळे यांनी भारताचा झेंडा घेऊन संपूर्ण अंगावर मराठी भाषा व नारळ-पोफळीच्या लोगोची रंगभूषा केली होती. आयुषी आयुष प्रसाद यांनी लहान बाळाला बाबागाडीत बसवून स्पर्धा पूर्ण केली. काही धावपटूंनी पारंपरिक वेशातही धाव पूर्ण केली.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह डॉक्टर, अभियंते व समाजातील प्रतिष्ठित मंडळींनीही धाव पूर्ण केली. सर्व दिशादर्शक फलक मराठी भाषेत असल्याने ही मॅरेथॉन मराठी भाषेस समर्पित असल्याचे ठळकपणे दिसून आले. बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेतील 108 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. भाट्ये समुद्रकिनारी शिवरुद्रा ढोलपथकाने ढोल-ताशांच्या गजरात वातावरण दणाणून सोडले. आरोही फिजिओथेरपी, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, लोकमान्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांनी धावपटूंना वैद्यकीय मदत पुरवली.

मराठी भाषेसाठीचे आयोजन कौतुकास्पद : उदय सामंत

कोकण कोस्टल मॅरेथॉनचे तिसरे वर्ष नावीन्यपूर्ण असून, एखाद्या भाषेसाठी मॅरेथॉन आयोजित होण्याचे हे जगातील पहिले उदाहरण आहे. इंग्रजी गाण्यांऐवजी मराठी गीतांतून आणि पारंपरिक वेशभूषेत ही स्पर्धा पार पडत असल्याने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेले हे प्रयत्न अभिनंदनास्पद असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3366850
Share This Article