रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील नूतन शिक्षण विस्तार अधिकारी आणि विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या केंद्र समन्वयकांचा भव्य सत्कार सोहळा फाटक हायस्कूल येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार होते, तर प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष तुकाराम मुरकुटे यांनी केले.
या सोहळ्यात नूतन शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, सारिका शिंदे तसेच नवनियुक्त केंद्र समन्वयकांचा त्यांच्या विद्यार्थीभिमुख व गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मधुरा सावंत यांनी उपस्थित सदस्यांना मोलाचे आरोग्य मार्गदर्शन केले. आदर्श शिक्षक अंकलगे सर, जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर, महिला आघाडी प्रमुख विभा बाणे आणि चिपळूण तालुकाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या मनोगतातून नूतन अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कार सोहळ्यानंतर महिला शिक्षकांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आणि पुरुष शिक्षकांसाठी ‘फनी गेम्स’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. खेळ पैठणीचा मध्ये सौ. माधुरी अनिकेत शिंदे पाटील यांनी प्रथम तर शिवशाला लक्ष्मण सोनटक्के यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या फनी गेम्समध्ये संजीवन पांडुरंग दराडे यांनी प्रथम तर नवनाथ तानाजी वाळवेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी व नियोजन जुनी पेन्शन संघटना रत्नागिरी तालुका कार्यकारिणी व महिला आघाडीने केले. कार्यक्रमासाठी खास थीम सॉंग तयार करण्यात आले होते. सूत्रसंचालन रामदास चव्हाण यांनी केले तर आभार तालुका सरचिटणीस अवधूत शिंदे यांनी मानले. या सोहळ्याला तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





