रत्नागिरी: येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाकरिता रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यात येणाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. संगमेश्वर आणि लांजा येथील पुलाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील, यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. त्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्रे असतील, असे बैठकीत सांगण्यात आले. ही केंद्रे अशी – खेड- हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणे नाका. चिपळूण – सवतसडा दर्शन, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका, अलोरे घाट माथा, सावर्डे बाजारपेठ. संगमेश्वर – आरवली एसटी स्थानकाजवळ, देवरूख- मुर्शी बावनदी पुलाच्या पलीकडे, रत्नागिरी – हातखंबा तिठा, पाली, बावनदी पुलाच्या अलीकडे, कोकजे वठार येथील नवीन पुलाजवळ. लांजा – वेरळ, कुवे गणपती मंदिरासमोर. राजापूर – एसटी स्थानक.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यात येणारे घाटरस्ते, महामार्ग याठिकाणी वाहतूक मदत केंद्र, रुग्णवाहिका, जेसीबी, क्रेन राहतील याचे नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत. वळण रस्त्यावर रम्बलर, वेग मर्यादेबाबतचे फलक, आपत्कालीन संपर्क क्रमांक, दिशादर्शक, 24 तास फिरते गस्त पथके यावर भर द्यावा. रिक्षाचालकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुंबई तसेच इतर शहरातून रत्नागिरीत येणाऱ्या रेल्वे प्रवाशांकरिता रेल्वे स्थानकावर जादा बसेस परिवहन महामंडळाने ठेवाव्यात. गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्रे
