संगमेश्वर: कोकणातील निसर्गसंपन्न पर्यावरणाला घातक ठरू पाहणाऱ्या विषारी रासायनिक कंपन्यांविरोधात लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. इटलीसारख्या देशातून नाकारल्या गेलेल्या प्रदूषकारी प्रकल्पांना कोकणात स्थान दिल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याविरोधात पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकरी, बागायतदार आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला असून, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
या आंदोलनादरम्यान ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी एमआयडीसीतील भयावह वास्तवावर प्रकाश टाकला. गेल्या साडेतीन दशकांपासून सुरू असलेल्या या कंपन्यांनी हवेत विषारी वायू सोडण्यासोबतच सांडपाण्याचे नियोजन न करता भूजल साठेही प्रदूषित केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या उग्र वायूमुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले असून, प्रत्येक घरात आज कर्करोगासारखे गंभीर आजार बळावत असल्याचे चित्र समोर येत आहे. हा विकास नसून स्थानिक जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारा प्रकार असल्याचे सांगत, लोकांच्या जीवावर बेतणारा कोणताही रोजगार आम्हाला मान्य नसल्याचा ठाम इशारा आंब्रे यांनी दिला.
शेतकरी कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घातक कंपन्यांवर तात्काळ बंदी घालावी, प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारखानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि लोटे परिसरातील नागरिकांची तातडीने आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या आंदोलनावर शासन आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






