खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यात रसायनयुक्त विषारी सांडपाणी मिसळल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना विषबाधा झाली असून, ८ ते १० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने लोटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी सकाळी लोटे, पिरलोटे, धामणदेवी, नवीन वसाहत, शिवाजीनगर, विठ्ठलवाडी, पोरवाडी आणि खरवली अशा विविध वस्त्यांमध्ये नळावाटे अचानक पिवळसर आणि हिरवट रंगाचे, उग्र वास असलेले पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराहट पसरली. सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या सांडपाणी वाहिनीचे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने हे रसायनयुक्त पाणी जवळच असलेल्या एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये झिरपले आणि थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचले. हा प्रकार समोर येताच संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर धाव घेत व्यवस्थापनाला जाब विचारला. एमपीसीबी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर झालेल्या चर्चेत कंपनी व्यवस्थापनाने सदर पाणी त्यांच्याच कंपनीचे असल्याचे मान्य केले आहे.
या संतापजनक प्रकारानंतर आता ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनासह एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळावर गुन्हे दाखल करण्याची आक्रमक तयारी सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे नमुने संकलित केले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पर्यावरण सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित दोषी कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी दिले आहे. मात्र, उद्योगांच्या अशा हलगर्जीपणामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी लोटे पंचक्रोशीतून केली जात आहे.





