GRAMIN SEARCH BANNER

राजापूरच्या आठवडा बाजारात संशयास्पद महिलांचा वावर; पोलिसांचे व्यापारी आणि ग्राहकांना सतर्कतेचे आवाहन

Gramin Varta
401 Views

राजापूर: राजापूर शहरातील गुरुवारच्या पारंपरिक आठवडा बाजारात मागील काही दिवसांपासून काही संशयास्पद महिला फिरत असल्याचे निदर्शनास आले असून, बाजारकरूंनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाजारात गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्स आणि मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी थेट बाजारात उतरून नागरिकांना सुरक्षेबाबत जागरूक केले आहे.

गुरुवारी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झालेली असताना, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार यादव, पोलीस उपनिरीक्षक उबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने संपूर्ण गुरुवार बाजार परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी पोलिसांनी बाजारातील स्थानिक व्यापारी, फेरीवाले आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांशी थेट संवाद साधला. गर्दीच्या ठिकाणी वावरताना महिलांनी आपल्या गळ्यातील दागिने व पर्स सांभाळावी, तसेच पुरुषांनी मोबाईल व पाकीट सुरक्षित ठेवावे, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी बाजार परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले होते. बाजारात खरेदीच्या बहाण्याने फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवर, विशेषतः काही टोळ्यांवर नागरिकांनी स्वतःहून लक्ष ठेवावे, असे पोलिसांनी सांगितले. खरेदीच्या गडबडीत गाफील न राहता आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी आणि बाजार परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास, अजिबात उशीर न करता तात्काळ राजापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन पोलीस निरीक्षक अमितकुमार यादव यांनी या वेळी केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बाजारकरूंनी समाधान व्यक्त केले आहे.

Total Visitor Counter

3420687
Share This Article