रत्नागिरी: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत छायाचित्रकारांना कर्ज मिळणार आहे. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबतचे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेने आज जागतिक छायाचित्रण दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. यानिमित्त छायाचित्रकारांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत विविध कर्ज योजनांचा मेळावा उत्साहात झाला. मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य या मिळाले. जिल्हा उद्योग केंद्र, बॅंकांनीही मार्गदर्शन केले.
शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी संकेत कदम, उद्योग निरीक्षक प्रियांका बळीवंत, बॅंक ऑफ इंडियाचे आशीष डगळे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शिवशंकर गोलसरे, रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे, सचिव सुबोध भुवड उपस्थित होते. कॅमेरा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. नीलेश कोळंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.
बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी छायाचित्रकारांना अद्ययावत कॅमेरा, उपकरणे, नवनवीन साधने खरेदी करावी लागतात. परंतु कर्जासाठी बॅंकांच्या दारी जावे लागते. तांत्रिक बाबीमुळे आवश्यक तेवढे कर्ज मिळत नाही किंवा अन्य समस्या येत असतात. ही अडचण सोडवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडीओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने छायाचित्रकारांसाठी विशेष कर्ज मेळावा आयोजित केला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मे महिन्यापासून ४५ वर्षे वयाची अट काढून टाकण्यात आल्यामुळे या योजनेचा फायदा रत्नागिरीतील छायाचित्रकारांना मिळू शकतो. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अल्पसंख्यांक यांच्यासाठी कर्जयोजनेत ५ टक्के स्वगुंतवणूक व ९५ टक्के बॅंक कर्ज देते. शहरीसाठी अनुदान २५ टक्के (कमाल ५ लाख रुपये) व ग्रामीणसाठी ३५ टक्के (कमाल ७ लाख रुपये) देय आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वगुंतवणूक १० टक्के, बॅंक कर्ज ९० टक्के, कमाल देय अनुदान शहरीसाठी १५ टक्के (३ लाख रुपये) आणि ग्रामीणसाठी २५ टक्के (कमाल ५ लाख रुपये) आहे. अर्जदाराने ऑनलाइन माध्यमातून अर्ज व कागदपत्रे सादर करावयाची आहेत. त्यानंतर छाननी होऊन बॅंकेकडे प्रकरण जाते. बॅंकेतून प्रकरण मंजूर झाल्यानंतर ऑनलाइन किंवा निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्याची अट आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी इमारत, जे. के. फाईल्स, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन संकेत कदम यांनी या वेळी केले.
छायाचित्रकारांनी लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज ऑनलाइन सादर करावेत, बैठकीमध्ये कागदपत्रांची छाननी, पूर्तता करून पात्र उमेदवारांना कर्ज देण्यासाठी व अनुदान मिळण्यासाठी पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बॅंकेचे अधिकारी आशीष डगळे यांनी सर्वांना बॅंक कर्ज कशा प्रकारे देते, सिबिल स्कोअर म्हणजे काय, कर्ज वितरण प्रक्रिया, परतफेड, बॅंकेतील व्यवहार कसे आहेत अशा विविध प्रकारची सविस्तर माहिती समजावून सांगितली. छायाचित्रकारांनी आपापल्या विविध समस्या सांगितल्या. २५ ते ३५ टक्के अनुदान मिळत असल्याने जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी राजापूरचे ज्येष्ठ छायाचित्रकार चारुदत्त नाखरे, लांज्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार विनय बुटाला यांच्यासमवेत रत्नागिरी शहरातील बहुसंख्य छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर उपस्थित होते. मुसळधार पाऊस व पूरस्थितीमुळे लांजा, राजापूर, देवरूख, संगमेश्वरमधील छायाचित्रकार कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माहिती देणार असल्याचे नीलश कोळंबेकर यांनी सांगितले.
रत्नागिरी : छायाचित्रकारांना मिळणार कर्ज
