रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात सोमवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. नाईक फॅक्टरीसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या एका बोलेरो गाडीवर अचानक वीजवाहिनी तुटून पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली. लागलीच नागरिकांनी उद्यमनगर एमआयडीसीमधील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी तब्बल एक तासाने पोहोचले, अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहिनी दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत केली. या विलंबामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.