रत्नागिरी, (प्रतिनिधी): साखरपा-संगमेश्वर मार्गावर कोंडगाव तिठा येथे एका लक्झरी बसने एका महिंद्रा एक्सयूव्ही कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसचालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३७ वाजता घडली.
याप्रकरणी मुंबई येथील प्रतीक्षा प्रकाश उपडे (वय ४५) यांनी देवरुख पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. प्रतीक्षा उपडे यांच्या कुटुंबियांचा वैभववाडीहून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू होता. त्यांचा मुलगा प्रतिक प्रकाश उपडे हा त्यांची महिंद्रा एक्सयूव्ही ७०० (क्र. MH ०२ GJ-२७८०) चालवत होता. पाचल, दाभोळे मार्गे कोंडगाव तिठा येथे पोहोचल्यानंतर ते साखरपा-संगमेश्वर रोडने मुंबईकडे जाण्यासाठी वळले.
त्याचवेळी देवरुख बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात लक्झरी बसने (क्र. MH ४३ CK.५२५३) त्यांच्या कारला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळी न थांबता आपल्या बससह पळून गेला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर प्रतीक्षा उपडे यांनी तात्काळ देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवरुख पोलिसांनी अज्ञात लक्झरी बसचालकाविरोधात भारतीय न्यायिक संहिता २०२३ चे कलम २८१, मोटार वाहन कायदा १८७, १३४, आणि १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या बसचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
भरधाव लक्झरी बसची कारला धडक; चालक फरार, देवरुखजवळ अपघात
