लांजा : तालुक्यातील आंजणारी शिखरेवाडी येथे अज्ञात चोरट्याने तब्बल ५ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी यशवंत शिखरे (वय ४५, रा. आंजणारी शिखरेवाडी) यांच्या घरातील कपाटाच्या लॉकरमधून ही चोरी झाली आहे. १२ मे २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडल्याचे समोर आले असून बुधवारी (दि. १ ऑक्टोबर) शुभांगी शिखरे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये २५ ग्रॅम ९६० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत २ लाख ५० हजार रुपये), १५ ग्रॅम ५२० मिली वजनाचा हार (किंमत १ लाख ५० हजार रुपये), ६ ग्रॅम वजनाची कर्णफुले (किंमत ९० हजार रुपये), ३ ग्रॅम ८८० मिली वजनाच्या कानसाखळ्या, २ ग्रॅम ५०० मिली वजनाची अंगठी (किंमत २५ हजार रुपये) तसेच ३ ग्रॅम १०० मिली वजनाची अंगठी (किंमत ३० हजार रुपये) असा एकूण ५ लाख ४५ हजारांचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिखरे यांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी केली. मात्र काहीच निष्पन्न न झाल्याने अखेरीस त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.
लांजात घर फोडून ५ लाख ४५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
