रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी प्रथमच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७६ टक्के विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
या कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य तपासले जात आहे. यासाठी विकसित करण्यात आलेल्या एआय आधारित ॲपमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती अचूक आणि निष्पक्षपणे तपासली जात आहे. पूर्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली केली जात असे, मात्र आता एआय तंत्रज्ञानामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करणे शक्य झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून, गेल्या १० ते १२ दिवसांत शेकडो शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. एआय प्रणाली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘शाबासकीची थाप’ देते, तर अप्रगत विद्यार्थ्यांना लेखन-वाचनाचा अधिक सराव करण्याचा संदेश देते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
जिल्ह्याच्या या यशामागे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे. पर्यवेक्षकीय कर्मचारी वर्गाची पदे निम्मीच भरलेली असतानाही, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात अग्रस्थान मिळवले. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत होत असलेल्या या तांत्रिक बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण विभागाच्या या नव्या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळकपणे उमटले आहे.