GRAMIN SEARCH BANNER

वाटदमध्ये देशातील पहिला प्रदूषणविरहित सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ऐतिहासिक घोषणा

रत्नागिरी:- “देशातला पहिला प्रदूषणविरहित सेमीकंडक्टर कारखाना आता आपल्याच वाटदमध्ये उभारला जाणार आहे,” अशी ऐतिहासिक घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे आयोजित भव्य प्रबोधन सभेत केली. या घोषणेने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी संघटना आणि स्थानिक शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे.

सभेला मोठी गर्दी जमली होती. सामंत यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना स्पष्ट केले की, “या एमआयडीसीमुळे माझ्या घरच्या माणसांचं नुकसान होणार नाही हे मला इतर कोणापेक्षा अधिक समजतं.” काही विरोधकांनी जुन्या व्हिडिओ आणि कवितांच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र, स्थानिक नेते (काका) यांनी दोन आंदोलने यशस्वीपणे पार पाडत या कारखान्याला पाठिंबा दिला याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.

ही सभा एका वेगळ्याच पद्धतीने पार पडली. व्यासपीठावर फक्त शेतकरी उपस्थित होते, तर पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते मंचावर नव्हते. याचा उल्लेख स्वतः सामंत यांनी करत, “मी आज शेतकऱ्यांसोबत आहे, कारण हा प्रकल्प त्यांच्या भविष्यासाठी आहे,” असे स्पष्ट केले.

सामंत यांनी या सेमीकंडक्टर प्रकल्पाचा राष्ट्ररक्षा क्षेत्राशी असलेला संबंध अधोरेखित करत म्हटले, “जी बंदूक सैनिकाच्या हातात असते, तीच बंदूक वाटदच्या एमआयडीसीमध्ये तयार होणार आहे. आणि ज्या गोळ्या पाकिस्तानला रोखण्यासाठी लागणार आहेत, त्या इथल्या मातीतूनच निघणार आहेत.”

त्यांनी यावेळी आपले अभिमान व्यक्त करत सांगितले की, “आपल्या सैन्याच्या जीवावर आपण सुखरूप झोपतो. त्या सैन्याच्या गरजांसाठी शस्त्रसामग्री तयार करणे हे आपले कर्तव्य आहे.”

सामंत यांनी या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना त्यांच्या गावीच नोकरीच्या संधी निर्माण होतील, यावर भर दिला. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पासाठी लागणार आहे, त्यांना न्याय्य मोबदला आणि योग्य पुनर्वसनाची हमी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. “प्रदूषणविरहित कारखाना जर मी वाटदमध्ये आणतोय, तर त्यात चूक काय आहे?” असा थेट सवाल करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

या प्रकल्पामुळे वाटद परिसराला औद्योगिक दृष्टिकोनातून नवा टप्पा गाठता येणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रदूषणविरहित प्रक्रिया या घटकांमुळे हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरणार असल्याचा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

2455607
Share This Article