कुटुंबांची आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांची होणार पाहणी
रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन 2025 – 26 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या केंद्र पुरस्कृत यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुका प्रकल्पांची (प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन) पाहणी केली जाणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत विविध घटकांसाठी 1000 गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व्हीस लेवल प्रोग्रेस 240 गुण, डायरेक्ट ऑब्जर्वेंशन ऑफ सॅनिटेशन स्टेटस ऑफ व्हिलेज 540 गुण, Direct Observation of Functionality of Plant 120 गुण, सिटीझन फिडबॅक 100 गुण अशा प्रकारे गुणांची विगतयारी करण्यात आली आहे.
यामध्ये प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावर निरिक्षणे नोंदवली जाणार आहेत. कुटुंबस्तर सर्वेक्षण, गाव स्तरावरील (शाळा, अंगणवाडी, पंचायतघर, बाजाराची ठिकाणे, सार्वजनिक शौचालय, आरोग्य सुविधा, तीर्थक्षत्रे) स्वच्छतेच्या व्यवस्था यांची पडताळणी केली जाणार आहे. यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कामे झाली आहेत अथवा कसे याबाबत निरिक्षणे नोंदवली जाणार आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 च्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर विविध मुद्यांच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी स्वच्छ सर्वेक्षणासाठी सज्ज रहावे. सर्वेक्षणांतर्गत जास्तीत जास्त गुण ग्रामपंचायतीला प्राप्त होणेसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गंत गावांचे होणार सर्वेक्षण
