GRAMIN SEARCH BANNER

दहावीच्या मुलाचा अद्भुत शोध; दारू पिऊन गाडी चालवल्यास इंजिन होणार बंद, मालकाला जाणार व्हाइस मेसेज “आपके कार का चालक नशे में है!”

सांगली : जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या अवघ्या दहावीत शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पासारे याने आपल्या कल्पकतेने आणि जिद्दीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह अलर्ट सिस्टम’ हे त्याचं क्रांतिकारी संशोधन केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, तर सामाजिक जाणीवेचंही प्रतीक ठरत आहे.

नशेत वाहन चालवणाऱ्यांमुळे देशात दरवर्षी हजारो अपघात होतात. ही स्थिती बदलण्यासाठी प्रेमने एक असं उपकरण तयार केलं आहे जे गाडी सुरू होण्याआधी चालकाने मद्यपान केलं आहे की नाही हे तपासतं. वाहनातील इग्निशन सिस्टममध्ये बसवलेला खास अल्कोहोल सेन्सर जर मद्याचा गंध ओळखतो, तर गाडी सुरू होत नाही. एवढंच नाही तर मालकाच्या मोबाईलवर एक कॉल येतो – “आपके कार का चालक नशे में है!” – यासोबत वाहनाचा क्रमांक, चेसिस नंबर आणि लोकेशन एसएमएस द्वारे पाठवलं जातं.

हे अत्याधुनिक उपकरण प्रेमने केवळ ₹१५,००० मध्ये तयार केलं आहे आणि त्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशनही विकसित केलं आहे. इतकंच नाही – त्याने यासाठी कॉपीराईटसाठीही अर्ज केला आहे!

या यंत्रामागे असलेली प्रेरणा मात्र अधिक भावनिक आहे. एका अपघातात आपली माणसं गमावणाऱ्या गावकऱ्यांचा दु:खद अनुभव आणि स्वतःच्या डोळ्यांसमोर घडलेली दुर्घटना यामुळे प्रेमच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. “नशेत वाहन चालवणाऱ्यांना थांबवण्यासाठी कोणताही उपाय नाही का?” – या प्रश्नातूनच या उपकरणाची कल्पना जन्माला आली.

प्रेमचे वडील एका चहा टपरीवर काम करतात. परिस्थिती अत्यंत साधी, पण त्याचं स्वप्न मोठं होतं. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला संधी दिली, त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला – आणि प्रेमने तो विश्वास सार्थ ठरवला. लाखो रुपये खर्च करूनही अपघात टाळण्यासाठी जे शक्य नाही, ते एका लहान गावातील तरुणाने केवळ इच्छाशक्ती, चिकाटी आणि कल्पकतेच्या जोरावर सिद्ध केलं आहे.

हे उपकरण केवळ एक शोध नाही – हे भविष्यात हजारो, लाखो प्राण वाचवू शकणारं जीवनरक्षक साधन ठरू शकतं. प्रेमने हे दाखवून दिलं की वय, पैसा, किंवा शहरं म्हणजेच प्रगती नव्हे – तर तीव्र सामाजिक जाणीव आणि काहीतरी बदल घडवण्याची धडपड यालाच खरी प्रगती म्हणतात!

Total Visitor Counter

2455627
Share This Article