मुंबई : अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनंतर शिक्षण संचालनालयाने ‘ओपन टू ऑल’ या विशेष फेरीचे नियोजन केले आहे. या फेरीसाठीच निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या फेरीसाठी राज्यभरातून ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यातील ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ८ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आतापर्यंत १४ लाख ५५ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ८२ हजार ८१ विद्यार्थ्यांनी चार फेऱ्यांत प्रवेश निश्चित केले आहेत. नियमित फेऱ्यांनंतर शिक्षण संचालनालयाने ४ व ५ ऑगस्ट रोजी ‘ओपन टू ऑल’ या विशेष फेरीअंतर्गत प्रवेशासाठी नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि प्राधान्य क्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
४ व ५ ऑगस्ट या दोन दिवसांत १७ हजार १४० विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच नियमित फेरीसाठी ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले. तसेच व्यवस्थापन कोट्याअंतर्गत २२ हजार ८५५, अल्पसंख्यांक कोटयाअंतर्गत ८ हजार ४३१ इतक्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केले होते. प्राधान्यक्रम भरून अर्ज अंतिम केलेल्या ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यात कला शाखेतील ९६ हजार ३ विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेसाठी ७७ हजार ४४७ विद्यार्थ्यांना, विज्ञान शाखेसाठी १ लाख ७५ हजार ३३४ विद्यार्थ्यांना शाखानिहाय प्रवेशाची संधी मिळाली आहे. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थांना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
राज्यातील इयत्ता अकरावीचे वर्ग ११ ऑगस्ट २०२५ पूर्वी सुरु करणे आवश्यक आहे. तशा सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेली राज्यातील ९ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालये ही ११ ऑगस्टपूर्वी सुरू होणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावीच्या ‘ओपन टू ऑल’ फेेरीसाठी ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
