रत्नागिरी : जलजीवन मिशनच्या कामानिमित्ताने क्षेत्रीय भेटीसाठी अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या गाड्यांचे मागील १० महिन्यांपासून ५० लाख रुपयांचे भाडे थकले आहे. त्यामुळे गाड्या पुरवठादार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनांद्वारे घराघरात नळकनेक्शन देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावे, वाड्या, वस्त्यांमधील पाण्याची समस्या दूर होणार आहे. जिल्ह्यात १,४०० पेक्षा जास्त पाणीपुरवठा योजनांची कामे आहेत. या योजनांची कामे जिल्ह्यात वाड्या-वस्त्यांवर सुरू आहेत. मात्र, कामे सुरू असली तरी अजूनही ठेकेदारांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. ८० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. त्यामुळे ठेकेदार रडकुंडीला आलेले आहेत.
दरम्यान, जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांची कामे जिल्ह्यात वाड्यावस्त्यांवर सुरू आहेत. त्या कामांकडे लक्ष देण्यासाठी कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता, तसेच ९ तालुका उपअभियंते, अशा एकूण ११ गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा वापर क्षेत्रीय भेटी देण्यासाठी अधिकारी करतात. मात्र, या गाड्यांचे ऑक्टोबर २०२४ पासूनचे भाडे थकीत आहे. त्यामुळे त्या गाड्या पुरवठादार आर्थिक अडचणीत आले आहेत. थकीत भाडे मिळावे यासाठी पुरवठादार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, शासनाकडून निधी आल्याने अधिकारी तरी थकीत भाडे कुठून देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जलजीवन अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या खासगी गाड्यांचे ५० लाखांचे भाडे थकले
